सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

व्यथा मनीची

माळीण गावातील दुर्घटनेला 2 महिने उलटून गेल्यानंतर ही किती भीषण मनस्थितीत व विमनस्क अवस्थेत  आज माळीण ग्रामस्थ आहेत याची जाणीव झाली.  माळीण गावातील आपल्या समाजबाधंवासाठी काही तरी करायला पाहिजे असे  सारखे वाटत होते मनाला एक अस्वस्थेची टोचणी लागून राहिली होती. परंतु pngs च्या आम आदमी योजनेच्या माध्यमातून काम करत असताना माळीण दुर्घटनेतील वाचलेल्या बांधवांना मदत करायला मिळाली. हया बांधवांशी संपर्क करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सगळ्या अडचणींवर मात करून claim payment   चे पत्र आणि  lic च्या मायेची ऊब सदोदित त्यांच्या बरोबर राहावी यासाठी प्रत्येकी एक रजई देण्यात आली. हा OFFICIAL कार्यक्रम संपल्यावर संघटनेच्या वतीने माळीण ग्रामस्थांना मदत देण्यासाठी त्यांच्या शी चर्चा करण्यात आली.

त्यांच्या समवेत मनमोकळा संवाद  व्हावा यासाठी संघटनेच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली होती. उद्देश हाच होता की आपल्या कडून काही मानसिक, भावनिक आधार देता येतोय का ? स्वतः आधी दुसर्‍याचा विचार करणारी मी त्यांच्या दुःखाची कल्पना ही करू शकत नव्हते. एका मोठ्या मानसिक आंदोलनात हेलकावे खात असणाऱ्या  माळीणवासीयांचे, माझ्या आदिवासी बांधवांच्या दुःखद कहाण्या, प्रसंग ऐकून मन अक्षरशः विदीर्ण झाले. आपले जिवलग, नातेवाईक क्षणार्धात नाहीसे होणे , दुःखाचा ङोंगर कोसळणे हे शब्दशः काय असते ते हया सगळ्याच्या ङोळयात दिसत होते.

28 वर्षीय नामदेव पोटे जेव्हा आपल्या 10 महिने वयाच्या मुलाचा आणि बायकोचा फोटो दाखवितो तेव्हा नामदेव च्या ङोळयात त्याने त्या मातीच्या, चिखलाच्या ढिगार्यावर आपल्या पिल्लाला शोधण्याची केलेली धडपड दिसते असहायता दिसते. 24 वर्षीय सविता लेंभे आपल्या आई वडिलांना शेवटचे पाहूनही शकत नाही. गावात जाण्याचे रस्ते अडविले असल्याने भर पावसात आक्रोश करणारी सविता आज आपल्या 3 भावांची जबाबदारी घेऊन उभी आहे. एस.टी महामंडळात कङंकटर (वाहक) असलेली सविताच्या ङोळयातील पोरकेपणाची आणि अनाथपणाची छटा मन हेलावून जाते. तिच्या कडे बघताना तिच्या विषयी वात्सल्याचा उमाळा मनात दाटून आला आणि ङोळयातील अश्रू मनाला न जुमानता कधी निघून गेले कळलेच नाही.

30 वर्षीय स्वाती आपल्या 1 वर्षाच्या बाळासह भेटली तिच्या साथीदाराला  नियती ने अर्ध्यातुनच नेले.ती 2 छोट्या मुली आणि एक मुलगा यांच्या  पालनपोषना च्या विवंचनेत आहे. मुलांना घेऊन आईकडे आश्रयाला गेली आहे. मुलाचं भविष्य साथीदारा शिवाय एकटीने कस पेलणार ही तिची आगतिकता देहबोलीतून जाणवत होती. स्वाती ची वेदना सांत्वनाच्या शब्दा पलीकडची होती. आपले सांत्वन पर शब्द किती पोकळ आहेत हे जाणवत होतं. नवर्‍याची आठवण सांगताना भावनांचा बांध कधी फुटला तिला कळलच नाही. आम्ही सगळे स्तब्ध होतो आणि शब्द मुके झाले होते.

हे सगळे प्रातिनिधीक व्यक्ती आहेत असे अजून वाचलेले अभागी आदिवासी बांधव सध्या असाणे आश्रम शाळेत आश्रयाला आहेत. ज्यां च्या कडे सरकारी मदत आहे, बँकेत पैसे आहेत पण राहायला घर नाही. पुनर्वसनासाठी जागा मिळत नाही. 20 जणांना तात्पुरता निवारा म्हणून पत्र्याची शेङ ठोकून दिली आहे. मदतीचा ओघ आता थांबतोय. आता खरी जगण्याची लढाई सुरु होतेय. ह्या त्यांच्या लढाईत LIC कडून मिळणार्‍या CLAIM SETTLEMENT मध्ये मदत करणे हा प्रयत्न किती तोकडा आहे हे प्रत्यक्ष माळीण गावात गेल्या वर कळाले.

हा लेखन प्रपंच एवढ्याच साठी की माळीण दुर्घटनेची तीव्रता इतकी भयानक होती माझ्या साठी की आम आदमीचे VOUCHER काढताना अतिशय वेदना होत होत्या. ही अस्वस्थता कागदावर प्रकट झाल्याने हलकी होईल इतकच. उर्वरित पाॅलीसींचे CLAIM मिळवून देण्यासाठी मदत करून ही अस्वस्थता  कमी करण्याचा प्रयत्न आहे.